रत्नागिरी प्रतिनिधी : भारताला उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर बनवून सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून नावारूपास आणण्यासाठी नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘सेमीकॉन इंडिया २०२६’ परिषद पार पडली. या परिषदेदरम्यान महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आकारास येत असलेल्या ‘व्हीटीआय सेमीकॉन’च्या हजारो कोटी रुपयांच्या भव्य सेमीकंडक्टर पार्क प्रकल्पासाठी दोन ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले. चीन आणि तैवानसारख्या देशांवरील भारताचे परकीय अवलंबित्व संपुष्टात आणणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असून यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
या परिषदेत व्हीटीआय सेमीकॉनने जगातील दोन आघाडीच्या दिग्गज कंपन्यांशी तंत्रज्ञान व उपकरणांसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी निश्चित केली. यातील पहिल्या ऐतिहासिक करारावर जपानच्या जगप्रसिद्ध ‘हिटाची’ कंपनीचे कार्यकारी अधिकारी हिरोशी शिमाझाकी आणि व्हीटीआय सेमीकॉनचे व्यवस्थापकीय संचालक ताजपूर कन्नन यांनी स्वाक्षरी केली. या करारान्वये हिटाची कंपनी रत्नागिरीतील प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रगत उत्पादक यंत्रसामग्री पुरवणार आहे. तर दुसरा महत्त्वपूर्ण करार अमेरिकेच्या दिग्गज ‘केएलए’ कंपनीसोबत पार पडला असून त्यावर केएलएचे कार्यकारी अधिकारी चिया वी टेक आणि ताजपूर कन्नन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. केएलए कंपनी या संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आधुनिक तांत्रिक उपकरणे उपलब्ध करून देणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद आणि झाडगाव एमआयडीसी परिसरातील विस्तीर्ण जागेवर हा भव्य सेमीकंडक्टर प्रकल्प साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. फॅबलेस आणि उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हीटीआय सेमीकॉनच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील तरुण अभियंत्यांना जागतिक स्तरावरील उच्च तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग सुकर होईल. या प्रस्तावित संकुलात प्रामुख्याने सिलिकॉन वेफर्स, मोबाईल, ऑटोमोबाईल वाहने तसेच आधुनिक डेटा सेंटर्ससाठी लागणाऱ्या प्रगत इलेक्ट्रॉनिक चिप्सचे डिझाईन आणि प्रत्यक्षात उत्पादन केले जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञान करारामुळे केवळ कोकण प्रांताच्या औद्योगिक विकासालाच नवी गती मिळणार नसून भारताच्या स्वावलंबनाच्या दिशेने हे एक अत्यंत प्रभावी पाऊल ठरणार आहे.





