रायगड: पुण्यातील एका महाविद्यालयात शिकणारा तरुण ताम्हिणी घाटातील मिल्कीबार वॉटरफॉलच्या खोल कुंडात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आयुष शिवसिंग नेगी (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील होता आणि सध्या पुणे जिल्ह्यातील भुकूम, पिरंगुट येथे राहून पीआयबीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
आयुष आपल्या मित्रांसोबत धबधबा पाहण्यासाठी ताम्हिणी घाट परिसरात आला होता. फिरत असताना पाय घसरून किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल कुंडात बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्यातील एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम (कोलाड) आणि शेलार मामा रेस्क्यू टीम (भिरा-पाटणूस) या दोन शोध पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सागर दहिंबेकर आणि प्रकाश शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम राबवण्यात आली.
रात्रीची वेळ, कुंडाचा प्रचंड अंधार आणि २५ ते ३० फुटांची मोठी खोली यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत कठीण झाले होते. सुमारे साडेचार तास अथक प्रयत्न केल्यानंतर पथकाला कुंडाच्या तळाशी आयुषचा मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे ताम्हिणी घाटातील धोकादायक पर्यटनस्थळे आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.




