रायगड:रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध टकमक टोकावरून उडी मारून ३७ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या पत्नीला व्हॉट्सॲपवर टकमक टोकाचे फोटो पाठवून जीवन संपवत असल्याचा मेसेज पाठवला होता.
सुयोग सुरेश पांचाळ (वय ३७, मूळ रा. बीजघर, खेड, जि. रत्नागिरी; सध्या रा. रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे मृत तरुणाचे नाव असून, ड्रोनच्या सहाय्याने दरीत त्याचा मृतदेह निदर्शनास आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ शनिवारी पहाटे रायगड किल्ल्यावर पोहोचला होता. त्याने आपली आर्टिगा कार किल्ल्याच्या पायथ्याशी उभी करून पायऱ्यांच्या मार्गाने गडावर प्रवेश केला.
सकाळी साडेसातच्या सुमारास तो टकमक टोकावर गेला आणि त्याने पत्नीला मेसेज करून मोबाईल बंद केला. घटनेची कुणकुण लागताच त्याचा भाऊ सुवेल पांचाळ यांनी रायगडावर येऊन शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर शनिवारी सायंकाळी महाड तालुका पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी गडाच्या पायथ्याशी सुयोगचे वाहन शोधून काढले. रात्री अंधार असल्यामुळे शोधमोहीम थांबवावी लागली होती. रविवारी सकाळपासून पोलिस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान ड्रोनच्या माध्यमातून पाहिले असता दरीत सुयोगचा मृतदेह दिसून आला. पोलीस निरीक्षक अभिजीत नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाकडून दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, महाड तालुका पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या; पत्नीला मेसेज पाठवून संपवले जीवन
Leave a Comment





