अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या दालनातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी धडक सापळा रचून अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक योगेश भस्मे याला तब्बल दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या शिक्षिका असलेल्या पत्नीची सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी ही लाचेची रक्कम उकळण्यात येत होती. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातच घडलेल्या या लाचखोरीच्या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेतील कथित भ्रष्टाचाराचे कारनामे पुन्हा एकदा उघड्यावर आले आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती पार पडली असून नव्याने नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांना दुर्गम भागात पदस्थापना मिळाली होती. त्यामुळे स्वतःच्या मर्जीनुसार सोयीच्या शाळेत बदली मिळवण्यासाठी शिक्षकांचे विविध पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू होते, ज्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण सुरू असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर, तक्रारदार यांच्या शिक्षिका पत्नीची बदली करण्यासाठी स्वीय सहाय्यक योगेश भस्मे याने थेट दीड लाखांची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात तातडीने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, भस्मे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयात सापळा रचला. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास तक्रारदाराने अध्यक्षांच्या दालनातील कार्यालयात जाऊन भस्मे याच्या हातात दीड लाख रुपयांची रोकड दिली. ठरल्याप्रमाणे भस्मे लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. ही लाच नेमकी कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली आणि यात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, या दिशेने आता संशय व्यक्त होत असून प्रत्यक्ष अध्यक्षांचीही या प्रकरणात चौकशी होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे, पोलीस उपनिरीक्षक अरुण करकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुषमा राऊळ, अंमलदार परम ठाकूर आणि पोलीस शिपाई वदीप नांदगावकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीविरुद्ध कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.





