लांजा (अरबाज नेवरेकर): ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गगनभेदी जयघोषात, ढोल-ताशांच्या मंगलमय गजरात लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाला अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. बारा दिवसांच्या मनोभावे पाहुणचार आणि सेवेनंतर यंदा लांजा तालुक्यात २०३५ घरगुती आणि ८ सार्वजनिक अशा एकूण २०४३ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन शांततेत पार पडले.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या विघ्नहर्त्या बाप्पाच्या विसर्जनासाठी लांजा शहर आणि ग्रामीण भागातील नदीकाठ, विहिरी आणि तलावांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जनस्थळी पारंपरिक पद्धतीने महाआरती करून भाविकांनी कुटुंबियांचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि बळीराजाच्या शेतीला उत्तम उत्पन्नाचे फळ लाभू दे, अशी प्रार्थना लाडक्या गणरायाचरणी केली. आरती संपताच निरोपाच्या क्षणी अनेक भाविकांचे डोळे पाणावल्याचे भावुक चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, अनंत चतुर्दशीचा हा विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी लांजा पोलीस प्रशासनाच्या वतीने तालुक्यात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियंत्रण आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या चोख नियोजनामुळे संपूर्ण तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या.






