बीएलओ कामकाज, सेवा पुस्तके, समायोजनासह विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद
लांजा (अरबाज नेवरेकर): शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लांजा तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (१४ ऑक्टोबर) गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या प्रशासकीय अडचणींसह विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांची सेवा पुस्तके तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच बीएलओ, निवडणूक व जनगणनेच्या कामांचा अतिरिक्त भार काही शिक्षकांवर पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. या कामांच्या वाटपात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
शिक्षकांकडून माहिती मागविताना ‘माहितीचा वार शनिवार’ या उपक्रमाचे पालन करावे, पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाबाबत मार्गदर्शन करून रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांचे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
स्मार्ट मीटर बसविलेल्या शाळांची वीजबिले शासनस्तरावरून भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांग शिक्षकांना शासकीय कामांच्या जबाबदाऱ्या देताना त्यांच्या परिस्थितीचा विचार करण्याच्या मागणीवरही सकारात्मक भूमिका दर्शविण्यात आली.
या भेटीवेळी तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, सरचिटणीस बळी सोळंकी, विलास गोरे, प्रजाप माने, विजय कदम, उमेश केसरकर, टीमसेकर, लिंगान्ना भुसनूर, नानासाहेब गोरड, बाळू नागरगोजे, मुस्तकीन पटेल, दिलीप चव्हाण, लीलाधर कुड, संजय पवार, प्रवीण सावंत, महेश गुरव, संतोष पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




