नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; ४ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
लांजा(अरबाज नेवरेकर): महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने लांजा नगरपंचायतीच्या वतीने आयोजित दिवाळी फराळ व विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.
नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांच्या सहभागातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, महिला व बालकल्याण सभापती प्रणाली तेली आणि मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळी फराळ, आकाशकंदील, पणत्या, ज्वेलरी, रेडिमेड कपडे यांसह विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी लांजा पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे,उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर ,नगरसेवक सचिन डोंगरकर,बांधकाम सभापती वैभव जोईल , गटनेते योगेश कावतकर, पाणी सभापती रफिक नेवरेकर, नगरसेविका निधी गुरव, श्रद्धा तोडकरी, सुशीला कांबळे, प्रांजल यादव, नीलिमा कनावजे, साक्षी मानकर, नेहा राडये, दुर्वा भाईशेट्ये तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रशासकीय अधिकारी अनघा भाटकर, गीतांजली नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रिना आल्हाट आणि समुदाय संघटक सुशांत नाखरेकर उपस्थित होते.
लांजा बाजारपेठेतील नगरपंचायत कार्यालयासमोर २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. सणासुदीच्या खरेदीसोबतच स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य देत नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सावली कुरूप व मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी केले आहे.





