लांजा : मद्यधुंद अवस्थेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत प्रवेश करून शिक्षकांना मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना लांजा तालुक्यातील वेरळ येथे घडली. शाळेतील शासकीय कामकाज सुरू असताना हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कुणाल शांताराम कुर्णेकर (वय ३८, रा. वेरळ गायदडीवाडी, ता. लांजा) याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा येथील धावणेवाडीचे रहिवासी असलेले शिक्षक नंदकुमार बळीराम भागवत (वय ५३) हे मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वेरळ मराठी शाळेत कार्यालयीन रजिस्टर भरण्याचे शासकीय काम करत होते. याचवेळी कुणाल कुर्णेकर हा मद्यधुंद अवस्थेत शाळेत दाखल झाला. त्याने कोणतेही कारण न देता शिक्षक भागवत यांच्या अंगावर धाव घेत त्यांच्या डाव्या कानावर चापटी मारली. त्यानंतर शाळेतील सहशिक्षकाची शर्टाची कॉलर पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच पुन्हा भागवत यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे शाळेतील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर शिक्षक नंदकुमार भागवत यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल कुर्णेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १३१, १२१(१), ३५२, ३५१(२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५(१)(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास संशयित कुणाल कुर्णेकर याला ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार आशिष शेलार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार विलास जाधव करत आहेत.






