लांजा/अरबाज नेवरेकर : महाराष्ट्र शासनाच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठी लांजा नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणाची मुदत आता १८ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या सर्वेक्षणात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच ३५ वर्षांवरील अविवाहित महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे. संबंधित महिलांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती तसेच त्यांच्या अडचणींची माहिती सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध होणार आहे.
संकलित माहितीच्या आधारे पात्र महिलांना शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायत हद्दीतील पात्र एकल महिलांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली नोंद करून घ्यावी, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
१८ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी उपलब्ध असल्याने संबंधित महिलांनी मुदतीपूर्वी सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे.





