बोलिव्हियाच्या युंगास जंगलात आढळली स्वतंत्र प्रजाती; १४ लाख वर्षांपूर्वी इतर मांजरांपासून झाली होती वेगळी
मुंबई : मांजरांच्या कुळाच्या अभ्यासात शास्त्रज्ञांना तब्बल एका शतकानंतर एका नव्या प्रजातीची ओळख पटली आहे. ‘लियोपार्डस टिल्कायो’ (Leopardus tilcayo) असे या रानमांजराचे नाव असून, ती बोलिव्हियातील युंगासच्या ढगाळ जंगलांमध्ये आढळते. जनुकीय विश्लेषणाच्या आधारे ही मांजर स्वतंत्र प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या शोधामुळे टायगर कॅटच्या वर्गीकरणाबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे. पेरूमध्ये आढळणाऱ्या टायगर कॅटची एक उपप्रजातीही या अभ्यासातून समोर आली असून, तिचे नाव ‘Leopardus tigrinus antisuyo’ असे ठेवण्यात आले आहे. यापूर्वी तिला ‘नॉर्दर्न टायगर कॅट’ मानले जात होते. मात्र, नव्या अभ्यासानुसार ती सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी इतर संबंधित मांजरांपासून वेगळी झाली होती.
१९२३ मध्ये उरुग्वेयन पांपास मांजराचा (Leopardus fasciatus) शोध लागल्यानंतर, जिवंत मांजराच्या नव्या प्रजातीची नोंद होण्याची ही शतकातील पहिलीच वेळ आहे. स्थानिक लोक या मांजराला ‘टिल्कायो’ म्हणतात. त्यावरूनच नव्या प्रजातीला हे नाव देण्यात आले आहे.
‘टिल्कायो’चे वजन केवळ १.५ ते २ किलोग्रॅम असून, शेपटीविना तिची लांबी सुमारे ५० सेंटीमीटर आहे. शेपटीची लांबी सुमारे २५ सेंटीमीटर असते. बोलिव्हियातील वन्यजीव आश्रमात सुमारे दहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘टिग्रिनो’ नावाच्या नर मांजरामुळे या प्रजातीच्या वेगळेपणाकडे शास्त्रज्ञांचे लक्ष गेले. त्याचे स्वरूप इतर मांजरांपेक्षा वेगळे दिसत होते; मात्र, तो स्वतंत्र प्रजातीचा असू शकतो, याची त्यावेळी कल्पना नव्हती, असे अभ्यासाच्या सहलेखिका आणि जीवशास्त्रज्ञ पाओला नोगालेस-अस्कारुंझ यांनी सांगितले.
टायगर कॅटची पहिली नोंद १७७५ मध्ये फ्रेंच गियानामध्ये झाली होती. त्यानंतर दक्षिण अमेरिकेत विविध प्रकारच्या टायगर कॅट आढळल्या. त्यांच्या बाह्य स्वरूपातील साम्यामुळे वर्गीकरणाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला होता. आधुनिक जनुकीय विश्लेषणामुळे आता या मांजरांच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि परस्परसंबंध अधिक स्पष्ट झाले आहेत.





