रत्नागिरी: चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयातील लेखाशास्त्र विभागप्रमुख प्रा. चेतन खांडेकर यांनी उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करत मुंबई विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली आहे. रत्नागिरीच्या स्वायत्त आर. पी. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयातील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सीएमए डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
गेली २२ वर्षे चिपळूणच्या डी. बी. जे. महाविद्यालयात लेखाशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक व मागील चार वर्षांपासून विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. खांडेकर यांनी ‘रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचे लागू पेन्शन योजनेवर आधारित गुंतवणूक प्राधान्यक्रम’ या विषयावर आपला सखोल प्रबंध सादर केला. या संशोधनामध्ये त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनांनुसार मिळणाऱ्या आर्थिक लाभांचा तुलनात्मक अभ्यास करून, पेन्शनच्या लाभांवर आधारित कर्मचाऱ्यांचे बदलणारे गुंतवणुकीचे प्राधान्यक्रम यावर वैशिष्ट्यपूर्ण प्रकाश टाकला आहे.
आपल्या संशोधन प्रबंधात त्यांनी जुन्या व नवीन पेन्शन योजनांमधील लाभांविषयी कर्मचाऱ्यांमधील सजगता, भविष्यातील वृद्धापकाळासाठी करावयाचे आर्थिक नियोजन, विमा खरेदीमागील प्रमुख उद्देश आणि गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापनाबाबत कर्मचाऱ्यांचे दृष्टिकोन अभ्यासले आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेअर मार्केट व म्युच्युअल फंडांचा परिपूर्ण अभ्यास करूनच त्यांची निवड करावी, तसेच शिस्तबद्ध आर्थिक नियोजनाचा अवलंब करावा, असा मोलाचा निष्कर्ष त्यांनी या अभ्यासातून मांडला आहे. विविध शासकीय खात्यांमधील जुन्या व नवीन निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्यांना गुंतवणूक आणि विम्याचे योग्य पर्याय निवडण्यासाठी हा अभ्यास दिशादर्शक ठरणार आहे.
डॉ. चेतन खांडेकर यांच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक कारकिर्दीतील या मोठ्या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.





