गणपतीपुळे: अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे दाखल झालेल्या हजारो भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने विशेष वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून दर्शनासाठी मंदिरात व मंदिर परिसरात गर्दी करणाऱ्या भाविकांना तात्काळ प्राथमिक उपचार आणि आवश्यक आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या सूचनांनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य मदतकक्ष कार्यान्वित करण्यात आला होता. या कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार यांच्यासह आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, राजेंद्र रणसे, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) मनाली तारवे, माधुरी ठाकरे, आरोग्य सेवक प्रवीण मंडले, विक्रम जाधव, आशा सेविका सारिका गावणकर आणि मदतनीस सांची गावणकर यांनी सेवा बजावली.
अंगारकी चतुर्थीसह मंदिर परिसरातील प्रमुख वार्षिक उत्सवांच्या वेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारे नियमितपणे आरोग्य व्यवस्थेचे नियोजन केले जाते. ऐन गर्दीच्या वेळी मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने आरोग्य विभागाने तत्परतेने उपलब्ध करून दिलेल्या या आरोग्य सुविधेबद्दल उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आरोग्य पथकाचे आभार मानले.






