रत्नागिरी: क्रिकेटच्या मैदानावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून रत्नागिरीत आलेल्या कल्याण (मुंबई) येथील दोन १६ वर्षीय उदयोन्मुख खेळाडूंचा कोळंबे येथील धोकादायक डोहात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने क्रीडा क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन शोकग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
सौरव पवनकुमार झा (वय १६) आणि शुभम रमेश यादव (वय १६, दोघे रा. कल्याण, मुंबई) अशी मृत पावलेल्या दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागासाठी कल्याण येथील एका नामांकित क्रिकेट ॲकॅडमीचा २० खेळाडूंचा संघ रत्नागिरीत आला होता. गुरुवारी दुपारच्या सत्रातील सामना संपल्यानंतर, सौरभ आणि शुभम हे दोघे इतर सहकाऱ्यांसमवेत क्रिकेट मैदानाच्या जवळच जंगलात असलेल्या पऱ्यामधील डोहात पोहण्यासाठी गेले. सदर डोह अत्यंत खोल व धोकादायक असल्याने स्थानिकांनी त्या ठिकाणी पोहण्यास बंदी असल्याचे दोन ते तीन चेतावणी फलकही लावले आहेत. मात्र, त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून या दोन्ही मुलांनी डोहामध्ये पोहण्यासाठी उडी मारली.
उडी मारल्यानंतर दोघेही पाण्याच्या पृष्ठभागावर न आल्याने काठावर असलेल्या इतर मुलांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, स्थानिकांना डोहातून दोघांना बाहेर काढण्यास विलंब झाला. बाहेर काढले असता त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. डोहात उडी घेतल्यानंतर ते पाण्यातील खडकावर आदळले असावेत आणि त्यामुळेच त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.
या दुर्घटनेनंतर मुंबईहून मुलांचे नातेवाईक रत्नागिरीत पोहोचले असता रुग्णालयात अत्यंत हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले होते. मुलांच्या दुर्दैवी निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परिस्थितीचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात धाव घेत मृत मुलांच्या पालकांची भेट घेतली. अश्रू अनावर झालेल्या कुटुंबीयांना धीर देत त्यांनी कठीण प्रसंगात मानसिक आधार दिला. या घटनेप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.




