स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पोषण माह व मानसिक आरोग्य सप्ताह कार्यशाळा उत्साहात संपन्न
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भविष्यात पूर्णपणे कुपोषणमुक्त व्हावा आणि जिल्ह्यात एकही कुपोषित बालक आढळू नये, हा प्रशासनाचा ठाम मानस आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि संबंधित प्रशासनाने दर्जेदार पोषण आहारासह समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित ‘पोषण माह व मानसिक आरोग्य सप्ताह कार्यशाळे’च्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कोरोना महामारीच्या संकटकाळात आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या कामगिरीचा गौरव करताना पालकमंत्री म्हणाले की, अत्यंत बिकट अशा संकटकाळात डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा भगिनी यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देवदूताप्रमाणे अविरत सेवा दिली. मानधनाचा विचार बाजूला ठेवून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान सदैव स्मरणात राहण्यासारखे आहे. याचबरोबर रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुरू केलेला शालेय विद्यार्थ्यांचा ‘इस्रो’ आणि ‘नासा’ भेट उपक्रम आज संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरला असून माळरानावर पहिला सोलर प्रकल्प उभारण्याचा मानही रत्नागिरीने मिळवल्याचे सांगत त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच आगामी संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सजग राहून काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी किशोरवयीन मुला-मुलींचे भावनिक स्वास्थ्य, मासिक पाळी व्यवस्थापन, वाढता स्क्रीन टाईम, प्रसूतीपश्चात मातांचे मानसिक आरोग्य तसेच संतुलित आहाराचे महत्त्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी मलिनाथ कांबळे यांनी प्रास्ताविकात या संयुक्त मोहिमेमागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान विविध भाज्या, फळे आणि तृणधान्यांची वेशभूषा परिधान करून आलेल्या चिमुकल्या ‘पोषण परी’ उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरल्या. याशिवाय पोषण आहार पाककृती प्रदर्शन, सुंदर परसबाग फुलवणाऱ्या सुधा किंजळे यांचा गौरव, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी प्रबोधनपर पथनाट्य, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मानसिक आरोग्यावरील नाटक आणि अंगणवाडी सेविकांची ‘पोषण जागर मंगळागौर’ अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, माजी आमदार संजय कदम, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के, कक्षाधिकारी नागरगोजे यांच्यासह आरोग्य व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली, तर शेवटी आभार प्रदर्शनाने या कार्यशाळेची सांगता झाली.





