रत्नागिरी : पाली येथून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला मागून येणाऱ्या एका भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मागे बसलेली त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाली येथील सबुरी हॉटेल लॉजसमोरील रस्त्यावर ही दुर्घटना घडली. जखमी महिलेवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या तपशिलानुसार, पाली बाजारपेठ परिसरातील एसटी स्टॅण्डजवळ राहणारे मनोहर गुणाजी बारे (वय ५२) हे आपली पत्नी मिनल मनोहर बारे यांच्यासमवेत दुचाकीने (क्रमांक एमएच-०८-एसी-४९७३) वळके येथे एका कार्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी सबुरी हॉटेल लॉजजवळून पेट्रोल पंपाच्या दिशेने वळत असतानाच, पाठीमागून वेगाने आलेल्या मोटारीने (क्रमांक एमएच-१४-एलयू-९७८७) त्यांना जोरदार धडक दिली.
हा आघात इतका तीव्र होता की बारे दाम्पत्य थेट रस्त्यावर फेकले गेले. अपघातात मनोहर बारे यांच्या शरीराला गंभीर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले, तर मिनल बारे याही गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मनोहर बारे यांची प्राणज्योत मालवली. जखमी मिनल बारे यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सदर मोटार सुशांत रमेश नेर्लेकर (वय ३८, रा. कोल्हापूर) हा चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची वर्दी मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शासकीय रुग्णालयात धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया हाती घेतली. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारचालक सुशांत नेर्लेकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.






