नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश; संभाव्य टंचाईसाठी आतापासूनच वॉटर बजेटिंगचे निर्देश
रत्नागिरी : पावसाने ऐन हंगामात फिरवलेली पाठ, लहरी हवामान आणि रणरणत्या उन्हामुळे जिल्ह्यातील भातशेती गंभीर संकटात सापडली असून बळीराजा पुरता होरपळून निघाला आहे. या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे, कातळवाडी आणि डुगवे परिसरातील करपून गेलेल्या व दाणा न भरलेल्या भातशेतीची पाहणी करून त्यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच उर्वरित सर्व बाधित भागाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून तत्काळ अहवाल शासनाकडे सादर करण्याचे कडक आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले.
जिल्ह्यात जुलै आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्याने भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी शेतातील करपलेली व पोकळ भाताची रोपे दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. वरून पीक काही प्रमाणात हिरवे दिसत असले तरी पोटऱ्यांमध्ये दाणा भरलेला नसून ओंब्या पूर्णपणे पोकळ आणि चिंब झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सामान्यतः भाताच्या रोपाला १२ ते १८ फुटवे येतात, मात्र यंदा पाण्याच्या तीव्र दुर्भिक्ष्यामुळे केवळ ५ ते ७ फुटवेच आले आहेत. त्यातच कडा करपा, काजळी आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक हातचे गेले आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी ओढवलेल्या भीषण परिस्थितीचीच पुनरावृत्ती यंदा झाल्याची खंत स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी, संकटाच्या काळात प्रशासन बळीराजाच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही दिली. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित सर्व गावांमधील काम स्थानिक ग्रामपंचायत व कृषी यंत्रणेमार्फत पुढील एक ते दोन आठवड्यांत १०० टक्के पूर्ण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक असल्याने सहायक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुर्गम भागात नेटवर्कची अडचण असल्यास ऑफलाइन डेटा नोंदवून नंतर अपलोड करण्याची मुभाही कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. शासनाकडून मिळणारी मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग व्हावी यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
केवळ पीक नुकसानीपुरते मर्यादित न राहता प्रशासनाने आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी एप्रिल ते जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू नये, यासाठी प्रत्येक गावाचे ‘वॉटर बजेटिंग’ (पाणी अंदाजपत्रक) तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच स्थानिक पाण्याच्या स्रोतांचा शोध घेऊन टंचाई निवारण आराखडा तयार करावा, तसेच गरजेनुसार शेतकऱ्यांना विंधन विहिरी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





