रत्नागिरी: तालुक्यातील गावडेआंबेरे कापुसतळी येथे आपल्या घराच्या अंगणात विनापरवाना व बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू साठवून विक्री करणाऱ्या एका इसमावर पूर्णगड सागरी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांच्या गावठी दारूसह साठवणुकीचे साहित्य जप्त केले असून संशयित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नितीन बाबल्या डोर्लेकर (रा. कापुसतळी, गावडेआंबेरे, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव शशिकांत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजे गावडेआंबेरे कापुसतळी येथील आरोपी नितीन डोर्लेकर याच्या घराच्या अंगणात अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपी हा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी हातभट्टीची दारू स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये २ हजार २५० रुपये किमतीची २१ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि कॅन, १०० रुपये किमतीचा २० लिटर मापाचा सफेद रंगाचा प्लास्टिक कॅन, दारूचा वास असलेल्या रिकाम्या बाटल्या भरलेले भगव्या रंगाचे प्लास्टिक क्रेट, निळ्या रंगाचे प्लास्टिक बास्केट तसेच पिवळ्या रंगाचे जुने प्लास्टिक बास्केट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२०२६ नुसार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(इ) अन्वये गुन्हा नोंदवला असून, या बेकायदेशीर दारू धंद्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.






