रत्नागिरी : तालुक्यातील वारे समुद्रकिनारी खडकांमध्ये एका अनोळखी पुरुषाचे प्रेत अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याच्याजवळ मिळालेल्या आधारकार्डवर केरळमधील व्यक्तीचे नाव आणि पत्ता नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारे समुद्रकिनारी खडकांमध्ये एका पुरुषाचे प्रेत अडकले असल्याची माहिती गावातील नागरिकांकडून मिळाली. त्यानंतर पोलीस पाटील अस्मिता अभय शिवलकर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये पुरुषाचे प्रेत अडकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून खडकांमध्ये अडकलेले प्रेत बाहेर काढण्यात आले.
मृत व्यक्तीच्या अंगावरील ट्रॅक पँटच्या खिशात बंद स्थितीतील वनप्लस कंपनीचा मोबाईल हँडसेट आढळला. तसेच त्याच्याकडे आधारकार्ड आणि फेडरल बँकेचे एटीएम कार्डही मिळाले. आधारकार्डवर रॉजर आर. कॅशस्ट्रो असे नाव, ३१ मे १९९६ ही जन्मतारीख आणि केरळमधील विझिंजम, तिरुअनंतपुरम येथील पत्ता नमूद आहे. एटीएम कार्डवरही रॉजर आर. कॅशस्ट्रो असे नाव असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण याबाबत अधिक तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.




