रत्नागिरी: रत्नागिरी-नागपूर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेली डोंगरांची अफाट कापाकापी आणि खोदाई आता निसर्गाच्या अस्तित्वावरच घाला घालत असून, या महामार्गावरील पन्हाळा ते हातखंबादरम्यान भूस्खलनाचा अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे. या महत्त्वाकांक्षी महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा ते रत्नागिरीतील हातखंबा या गावापर्यंतचा विस्तीर्ण पट्टा अतिसंवेदनशील डोंगर-दऱ्यांमधून मार्गक्रमण करतो. मात्र, रस्त्याच्या कामासाठी पाच-दहा फुटांपासून चक्क शंभर फुटांपर्यंत उंचीचे सह्याद्रीचे कडे उभे तासण्यात आले आहेत. काही सखल भाग आणि खोल दऱ्यांमध्ये भराव टाकून डोंगर बुजवले गेले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत हजारो महाकाय वृक्ष एकतर तोडले गेले किंवा मातीखाली कायमचे गाडले गेले आहेत. वर्षानुवर्षे याच वृक्षांच्या खोलवर गेलेल्या मुळ्यांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांना घट्ट जखडून ठेवले होते; म्हणूनच कितीही विक्रमी पाऊस पडला तरी या भागात पूर्वी मोठ्या दुर्घटना घडल्या नव्हत्या. आता मात्र हजारो वृक्षांचा आधार नष्ट झाल्यामुळे डोंगरमाथे पूर्णपणे उजाड, बोडके आणि ठिसूळ बनले आहेत.
डोंगरांच्या या अमानुष पोखरणीचा थेट फटका आता आंबा घाटाला बसू लागला असून, दरडी कोसळणे आणि रस्ता खचण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. घाटमार्गातील रस्ता वारंवार खचून वाहतूक वारंवार ठप्प करावी लागत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. भूस्खलनाचे हे भयंकर लोण आता केवळ घाटापुरते मर्यादित न राहता पार पन्हाळ्यापर्यंत पसरण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. साधारणतः १९८० च्या दशकापासून सह्याद्रीच्या पश्चिम घाट आणि कोकण पट्ट्याला भूस्खलनाचा मोठा उपद्रव सुरू झाल्याचे दिसते. मुंबई-गोवा महामार्गासह इतर मार्गांसाठी झालेली अव्याहत खोदाई, खनिजांच्या हव्यासापोटी पठारांची झालेली पोखरण आणि बेसुमार जंगलतोड यामुळे संपूर्ण कोकणात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. ज्या भागात हा महामार्ग विस्तारत आहे, तिथे पावसाचे वार्षिक प्रमाण तब्बल ५००० मिलिमीटरपेक्षाही अधिक नोंदवले जाते. डोंगर बोडके झाल्याने पावसाच्या या प्रचंड माऱ्यापुढे भूस्खलनाचा संभाव्य धोका अनेक पटींनी गडद झाला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगररांगांचा इतिहास पाहिल्यास दरडी कोसळण्याच्या आपत्तींनी अनेकदा भीषण मानवी संहार घडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १९८३ मध्ये दरडी कोसळण्याच्या ५० हून अधिक घटनांमध्ये २३ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. १९८९ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तब्बल १२ ठिकाणी दरडी कोसळून भाजे येथील ३८ व्यक्ती जिवंत गाडल्या गेल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात २००५ च्या प्रलयंकारी पावसात दरडी कोसळून जवळपास २०० जणांचा बळी गेला, तर २०१४ मध्ये माळीण दुर्घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली, ज्यात १५० लोक मातीखाली गाडले गेले. त्याचवर्षी आंबेगाव येथेही भूस्खलनाने हाहाकार उडवला होता. अलिकडच्या काळात २२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळिये हे अख्खे गाव ढिगाऱ्याखाली नष्ट होऊन ८७ निष्पापांचा अंत झाला, तर १९ जुलै २०२३ च्या मध्यरात्री रायगडच्या इर्शाळवाडीवर कोसळलेल्या भूस्खलनात शंभरावर लोकांचा बळी गेला. या काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाने केवळ रस्त्याचा विस्तार न पाहता, या मार्गावर कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करून संभाव्य महाप्रलय तातडीने रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.





