रत्नागिरी: तालुक्यातील परटवणे सरोदेवाडी, साई मंदिर परिसरातील एका बंद घरात एका ४३ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रामदास मोहन पाटील (वय ४३, रा. परटवणे सरोदेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बीएनएसएस १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परटवणे येथील स्थानिक रहिवासी शिवगण यांनी खबर देणाऱ्या व्यक्तीला फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा बंद असून घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे कळवले. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने परटवणे येथे येण्यास सांगितले. ही माहिती मिळताच खबर देणाऱ्यांनी चुलत भाऊ रामदास पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी तातडीने परटवणे सरोदेवाडी येथील घर गाठले. घराबाहेरून रामदास यांना वारंवार हाका मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा उघडून आत पाहिले असता, रामदास पाटील हे बेडरूममध्ये उताण्या अवस्थेत निपचित पडलेले दिसले. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घरात त्यांचा मृतदेह पूर्णपणे फुगलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रामदास पाटील यांना तातडीने उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद ९ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, रामदास पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.





