रत्नागिरी: मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सुवर्ण कामगिरी नोंदवली आहे. मुंबईत रंगलेल्या अंतिम फेरीत महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी सावंत देसाई हिने एकपात्री अभिनय स्पर्धेत आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर (गोल्ड मेडल) आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर युवा महोत्सवाच्या रंगभूमी (थिएटर) विभागात हे मानाचे सुवर्णपदक मिळाले असून या यशामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत तन्वीने सादर केलेल्या एकपात्री अभिनयाने उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली. मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेल्या ‘सखाराम बाईंडर’, ‘चारचौघी’ आणि ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील महत्त्वपूर्ण पात्रांच्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत तिने ऑडिशन देणाऱ्या एका संवेदनशील कलाकाराची व्यथा मांडली. सध्याच्या कलाक्षेत्रात कलागुणांपेक्षा समाजमाध्यमांवरील फॉलोअर्सच्या आकड्यांवरून कलाकारांची होणारी निवड या ज्वलंत विषयावर तिच्या सादरीकरणाने परखड भाष्य केले. अभिनय तिच्यासाठी केवळ प्रसिद्धीचे साधन नसून ते तिचे श्वास आणि जगणे आहे, हा विचार तिने ठामपणे मांडला. डिजिटल युगातील कलाकार आणि रसिक यांच्यातील बदलत्या नात्याचा वेध घेत, फॉलोअर्सपेक्षा खऱ्या रसिकांच्या डोळ्यातील दाद तिच्यासाठी लाखमोलाची असल्याचे तिने आपल्या अभिनयातून दाखवून दिले. पडदा पडल्यानंतरही प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रू किंवा चेहऱ्यावरील हसू हेच अभिनयाचे खरे सार्थक असते, हा भावपूर्ण संदेश देत स्वाभिमानाने ऑडिशन्स देत राहण्याचा तिचा निर्धार उपस्थितांना भावूक करून गेला.
तन्वी सावंत देसाई हिला या यशासाठी प्रा. आर्या वंडकर, प्रा. ओंकार रसाळ तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तब्बल आठ वर्षांनंतर महाविद्यालयाच्या खात्यात जमा झालेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.




