रत्नागिरी : शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या येथील संपर्क कार्यालयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीपजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. संपर्कप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात बोरकर यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा सविस्तर आढावा घेत संघटनबांधणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील सातत्यपूर्ण संवाद आणि व्यापक सभासद नोंदणी या त्रिसूत्रीवर भर देण्याचे मार्गदर्शन केले. पदांची घोषणा हा केवळ औपचारिक सोहळा नसून प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्यक्ष जनतेशी आणि पक्षसंघटनेशी नाळ जोडून जबाबदारी पार पाडणे हाच संघटनविस्ताराचा मुख्य पाया असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे अधोरेखित केले.
या बैठकीत रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, रत्नागिरी-सिंधुदुर्ग महिला लोकसभा संपर्कसंघटक नेहा माने, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, महिला आघाडीच्या नेत्या सायली पवार, ममता जोशी, रशिदा गोदड, रत्नागिरी उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, युवा सेना उपजिल्हाधिकारी संतोष हातणकर, युवा सेना लांजा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के आणि संदेश बारगुडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील नवनियुक्त विभागप्रमुखांची अधिकृत घोषणा करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संपर्कप्रमुख बोरकर यांनी संघटनात्मक परिस्थितीवर समाधान व्यक्त करतानाच, आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व स्तरांवरील पदाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने अधिक सक्रिय होऊन नवीन सभासद नोंदणीची मोहीम गतिमान करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तत्पूर्वी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी प्रदीप बोरकर यांचे स्वागत केले व संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून जिल्हा संघटनेशी थेट संवादाचा नवा दुवा अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीमुळे आगामी पक्षबांधणी आणि संघटनविस्तारासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.






