रत्नागिरी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी होणारी संभाव्य प्रतारणा रोखण्यासाठी आणि सुरक्षित, भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करून सुट्या मसाल्यांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत प्रशासनाने चिपळूण, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी ग्रामीण भागातून १ लाख ३७० रुपये किमतीचा एकूण ८४ किलो विविध मसाल्यांचा साठा जप्त केला आहे.
सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत मसाल्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, याचाच गैरफायदा घेत काही विक्रेत्यांकडून सुट्या व भेसळयुक्त मसाल्यांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यावर कठोर निर्बंध असतानाही जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये नियमांना हरताळ फासून मसाल्यांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या कारवाईत चिपळूण येथून २९ हजार ९२० रुपये किमतीचा १९ किलो मिक्स मसाला, गुहागर येथून ३६ हजार २५० रुपयांचा २५ किलो मिक्स मसाला आणि राजापूर परिसरातून २८ हजार २०० रुपये मूल्याचा ३० किलो कुर्डी मसाला जप्त करण्यात आला. याव्यतिरिक्त रत्नागिरी ग्रामीण भागातून ६ हजार रुपये किमतीची १० किलो चटणी ताब्यात घेण्यात आली आहे.
ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन कटिबद्ध असून, सुट्या मसाल्यांमध्ये भेसळीची दाट शक्यता असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे अन्न व औषध प्रशासन रत्नागिरीचे सहायक आयुक्त ललित गायकवाड यांनी स्पष्ट केले. विक्रेत्यांनी कायद्याचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करणे अपेक्षित असताना तीन तालुक्यांत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक तपासणी मोहीम सुरू राहील, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.





