रत्नागिरी /प्रतिनिधी : हिमालयातील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात गिर्यारोहणाची मोहीम पूर्ण करण्याचा संकल्प करताना त्यामागील प्रेरणाही तितकीच महत्त्वाची असते. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठ कार्याला अभिवादन म्हणून ‘Mt. Friendship Expedition 2026’ ही हिमालयीन गिर्यारोहण मोहीम समर्पित करण्याचा संकल्प रत्नागिरी पोलीस दलातील होमगार्ड जवान आकाश प्रमोद पालकर यांनी केला आहे.
नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. या सेवाभावातून मिळालेली प्रेरणा आणि कर्तव्यनिष्ठेची भावना आपल्या गिर्यारोहण मोहिमेतही जपण्याचा प्रयत्न राहील, असे पालकर यांनी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. शिस्त, धैर्य, संयम आणि चिकाटी या मूल्यांना सोबत घेऊन हिमालयातील प्रतिकूल हवामान, कठीण चढाई आणि आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही मोहीम केवळ साहसी उपक्रम नसून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सन्मानपूर्वक सलाम करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकर यांनी म्हटले आहे.
या हिमालयीन मोहिमेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकाश पालकर यांना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी शुभेच्छा दिल्या. मोहिमेची वाटचाल यशस्वी आणि सुरक्षित व्हावी, यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. गिर्यारोहणाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या सेवाभावाला अभिवादन करण्याचा हा उपक्रम कर्तव्य आणि साहस यांची सांगड घालणारा ठरत आहे. ‘आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मनःपूर्वक सलाम’ या भावनेतून पालकर यांनी ही मोहीम रत्नागिरी पोलिसांना समर्पित केली आहे.
हिमालयीन मोहिमेचे रत्नागिरी पोलिसांना समर्पण; होमगार्ड जवान आकाश पालकर यांचा अनोखा संकल्प
Leave a Comment






