देवरुख: देवरुखहून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. काल संध्याकाळी झालेल्या परतीच्या पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर माती वाहून आल्याने रस्ता अक्षरशः चिखलात रूपांतरित झाला आहे. अनेक ठिकाणी फूटभर चिखल साचल्यामुळे वाहने जागीच रुतून बसली असून, परिणामी काल रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
आज विजयादशमीचा पवित्र सण असल्याने राज्यभरातून शेकडो भाविक श्री देव मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आले आहेत. परंतु, रस्त्यावरील या भीषण परिस्थितीमुळे भाविक आणि स्थानिक ग्रामस्थ मध्येच अडकून पडले आहेत. दसऱ्यासारख्या मोठ्या दिवशी दर्शनासाठी निघालेल्या नागरिकांचा असा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सकाळी दहा वाजून गेले तरी प्रशासनाची किंवा संबंधित ठेकेदाराची कोणतीही मदत वा जेसीबी मशीन रस्ता मोकळा करण्यासाठी घटनास्थळी फिरकलेली नाही. या प्रशासकीय उदासिनतेमुळे नागरिकांचा रोष अधिकच वाढला असून, तातडीने रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
मार्लेश्वर मार्गावर चिखलाचे साम्राज्य ; दसऱ्याच्या मुहूर्तावर पर्यटकांसह भाविक रस्त्यातच अडकले
Leave a Comment





