पर्यटनातून आठ लाखांचे उत्पन्न, तर व्यवस्थापनावर नऊ लाखांचा खर्च; अव्वाच्या सव्वा वीजबिलांमुळे आर्थिक गणित कोलमडले
रत्नागिरी (प्रतिनिधी) : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले थ्रीडी मल्टिमीडिया शो आणि शिवसृष्टी हे पर्यटन प्रकल्प आता रत्नागिरी नगरपालिकेसाठी आर्थिक डोकेदुखी ठरू लागले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना वीजबिल आणि देखभालीचा खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यटनविकासासाठी उभारलेल्या या सुविधांचा आर्थिक ताळेबंद नेमका कधी जुळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरी नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, थ्रीडी मल्टिमीडिया शोच्या माध्यमातून मागील २० महिन्यांत पालिकेला केवळ आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दुसरीकडे, या प्रकल्पाच्या व्यवस्थापन आणि देखभालीसाठी नऊ लाख रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच, केवळ व्यवस्थापन आणि देखभालीवरील खर्चच उत्पन्नापेक्षा अधिक झाला आहे. त्यात वीजबिलाचा अतिरिक्त भार पडत असल्याने या प्रकल्पाचे आर्थिक गणित अधिकच बिघडले आहे.
थ्रीडी शो पूर्ण क्षमतेने सुरू असताना दरमहा दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत वीजबिल भरावे लागत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शो बंद असतानाही किंवा मर्यादित स्वरूपात सुरू असतानाही सुमारे एक लाख रुपयांचे वीजबिल पालिकेच्या माथी येत आहे. प्रत्यक्षात पर्यटन प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च यांच्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने या उपक्रमांच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नगरपालिकेसमोर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटदारांची देणी अशा अनेक समस्या आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची जुळवाजुळव करावी लागत असताना पर्यटन प्रकल्पांवरील वाढता खर्च प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. शहराच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या सुविधाच पालिकेच्या आर्थिक संसाधनांवर ताण आणत असतील, तर त्यांच्या संचालनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
या पार्श्वभूमीवर थ्रीडी शो आणि शिवसृष्टी प्रकल्पांच्या उत्पन्न-खर्चाचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक ठरत आहे. तिकीटदरांचा फेरविचार, वीजवापरात बचत करण्यासाठी उपाययोजना तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासारख्या पर्यायांचा विचार केल्यास आर्थिक भार कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, अशा उपाययोजनांबाबत पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पर्यटनविकास आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल साधण्यासाठी ठोस निर्णय कधी होणार, याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.






