रत्नागिरी : राज्यातील अनेक भागांत अनियमित आणि खंडित पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने ‘शिवसेना शेतकरी मदत केंद्र’ सुरू करून बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि महसूल मंडळ स्तरावर पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी ही केंद्रे कार्यान्वित करावीत, अशी सूचना कदम यांनी केली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त पिकांची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे, पंचनाम्यांची शासकीय प्रक्रिया समजावून सांगणे, आवश्यक अर्जांसाठी मार्गदर्शन करणे आणि पीकविम्यासह शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.
याशिवाय, सर्व तालुकाप्रमुखांनी संबंधित तहसीलदारांना तत्काळ निवेदने देऊन तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रशासकीय पाहणी करण्याची मागणी करावी. गावनिहाय पिकांचे अचूक पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठवावा, तसेच नियमांनुसार शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीकविम्याची रक्कम, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनावर दबाव आणावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
हे कार्य केवळ निवेदने देण्यापुरते मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शासकीय मदत मिळेपर्यंत शिवसैनिकांनी सक्रिय पाठपुरावा करावा, कारण संकटकाळात शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, असा पुनरुच्चार जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी यावेळी केला.






