रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील खेडशी मोरया एकतानगर येथून केस कापण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला सुयोग उत्तम कोलगे (वय २६, रा. घर नं. १३०२, एकतानगर) हा तरुण गेल्या महिनाभरापासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला आहे. २० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास सुयोगने आपली आई उल्का कोलगे हिला कारवांचीवाडी येथे केस कापायला जातो असे सांगितले आणि तो घरातून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि संभाव्य सर्व ठिकाणी त्याचा कसून शोध घेतला, परंतु त्याच्याबाबत कोणतीही माहिती हाती लागू शकली नाही.
सुयोग याला कोणा अज्ञात व्यक्तीने गैरमार्गाने डांबून ठेवण्याच्या हेतूने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अखेर त्याचे वडील तथा एसटी महामंडळाचे चालक उत्तम सदानंद कोलगे (वय ५४) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये गुन्हा रजि. नं. २२९/२०२६ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस पथक बेपत्ता तरुणाचा कसून शोध घेत आहे.






