रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा जेटीवर मासळी खरेदी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मच्छी सप्लायरवर लोखंडी फायटर आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिवाजी नगर येथील व्यावसायिक रज्जाक हमजा साब (वय ४३) हे गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी शफिक महमद शरीफ दर्वे (वय ४५) आणि अब्दुल्ला शफिक दर्वे (वय २२, दोघे रा. मिरकरवाडा) यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रज्जाक साब हे मिरकरवाडा जेटी येथे जमीर होडेकर आणि महंम्मद भाटकर यांच्याकडून मच्छी खरेदी करत होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी ‘तुला सांगितले होते ना, तरी तू मिरकरवाडा येथे मच्छी खरेदी करण्याची हिंमत कशी केलीस, आता तुझा मर्डरच करतो’ अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. वादादरम्यान शफिक दर्वे याने रज्जाक यांना घट्ट पकडून ठेवले, तर अब्दुल्ला दर्वे याने हातातील लोखंडी फायटरने त्यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर, छातीवर आणि पाठीवर सडकून मारहाण केली. मारहाणीमुळे साब जमिनीवर कोसळले असता, शफिक याने आपल्या पॅन्टमध्ये लपवलेला चाकू काढून साब यांच्यावर उगारला. स्वतःचा बचाव करण्यासाठी साब यांनी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला असता, तो चाकू थेट त्यांच्या कपाळावर लागून ते गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ झाले.
घटनास्थळी उपस्थित साक्षीदार आणि स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत रज्जाक साब यांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील पोलीस चौकी अंमलदारांनी नोंद घेतल्यानंतर रज्जाक हमजा साब यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपी शफिक दर्वे आणि अब्दुल्ला दर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





