रत्नागिरी : जयगड बंदराचा विकास आणि स्थानिक औद्योगिक गरजा लक्षात घेता, भोके रेल्वे स्थानक ते जयगड बंदर असा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर गंभीर विचार सुरू असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गासोबतच जयगड बंदर थेट साताऱ्याशी जोडण्याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या नव्या मार्गामुळे कोकणातील उद्योग आणि बंदर वाहतुकीला मोठी गती मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी तालुक्यातील इतर विकासकामांचा आढावा घेताना मंत्री सामंत यांनी वाटद खंडाळा येथील प्रस्तावित ९ हजार एकर जागेवरील ‘डिफेन्स क्लस्टर’ प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली. स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. प्रांताधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील अहवाल मागवण्यात आला असून तो प्राप्त होताच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आज सकाळीच स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांची घरे भूसंपादनातून मुक्त करणे आणि वहिवाटीचे हक्क कायम ठेवणे या मागण्या शासनाने मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी भविष्यात स्थानिकांच्या संमतीने प्रदूषणविरहित प्रकल्प आणण्यावर विचार केला जाईल. यावेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावकर यांनीही पत्रकार परिषदेत सरकारची सकारात्मक भूमिका आणि तिन्ही मागण्या मान्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, निव्वळ विरोधाला विरोध न करता भविष्यात येणाऱ्या प्रदूषणमुक्त प्रकल्पांचे स्वागत केले जाईल, असे नमूद केले. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाविषयी बोलताना, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्यासह शासन एका मतावर ठाम असून, स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोकणात कोणताही नवीन अथवा अणुऊर्जा प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही सामंत यांनी दिली.
अवकाश संशोधन आणि उपग्रहांच्या अनुषंगाने माहिती देताना, देशात पहिल्यांदाच विविध पाच क्षेत्रांसाठी पाच उपग्रह तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी उंच जागेची आवश्यकता असल्याने माचाळ या ठिकाणाचे नाव केवळ सुचवले होते, माचाळ येथे कोणताही ‘स्पेस पार्क’ उभारला जाणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. याशिवाय दिशा सालियन प्रकरणावर बोलताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीवर सरकार पूर्णपणे संवेदनशील असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, तर विशेष अधिवेशनाबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे स्पष्ट करत त्यांनी पत्रकार परिषद पूर्ण केली.





