रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा दर्जा अधिक दर्जेदार करण्यासाठी आणि रुग्णांना अद्ययावत सुविधा पुरवण्यासाठी विविध विकासकामांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकतीच ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार प्रतिनिधी म्हणून धामणसे येथील विश्वनाथ पांचाळ यांचे स्वागत करण्यात येऊन आरोग्य केंद्राशी निगडित विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आरोग्य केंद्राच्या नवीन वास्तूच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. रुग्णांची वाढती गर्दी आणि त्यांची सोय लक्षात घेता हा मजला तातडीने ताब्यात घेऊन तेथे बाह्यरुग्ण तपासणी कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सोबतच केंद्रातील शवविच्छेदन कक्षाची दुरुस्ती करणे, डीपबरिअरपीठची डागडुजी करणे या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे ठरले. नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी निधीची उपलब्धता करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यावरही भर देण्यात आला. याशिवाय केंद्रातील स्वच्छतेचा दर्जा राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
किशोरवयीन मुलींच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेले एचपीव्ही (HPV) लसीकरण संपूर्ण कार्यक्षेत्रात १०० टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वंकष नियोजन करण्याबाबत उपस्थितांमध्ये सहमती झाली. बैठकीदरम्यान राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या दौऱ्याविषयी आणि ‘जनसंवाद यात्रे’च्या तयारीबाबत संबंधितांना माहिती देण्यात आली. या महत्त्वपूर्ण सभेला पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, समितीच्या सचिव तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, तालुका प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. परशुराम निवेंडकर, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, समिती सदस्य आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य केंद्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला, तर बैठकीचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले.






