गणपतीपुळे / वैभव पवार: जागतिक ख्यातीचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम साथ लाभणार आहे. समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण तातडीने वाचवता यावेत यासाठी अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ यंत्रणा दाखल झाली असून, बुधवारी दुपारी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे समुद्रात या तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हे वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील दापोली, गुहागर व आरे-वारे समुद्रकिनाऱ्यांवर प्रत्येकी एक, तर पर्यटकांची वाढती संख्या विचारात घेऊन सर्वाधिक गर्दीच्या गणपतीपुळे किनाऱ्यासाठी दोन रोबोटिक वॉटर क्राफ्ट देण्यात आले आहेत. गणपतीपुळे येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते आणि अनेकदा उत्साहाच्या भरात खोल पाण्यात उतरणारे पर्यटक लाटांच्या प्रवाहात खेचले जाऊन दुर्घटना घडतात. अशा वेळी स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक, होमगार्ड व पोलीस यंत्रणा जिवाची बाजी लावून मदतकार्य करतात. या बचावकार्याला अधिक गती व सुरक्षितता मिळावी या उद्देशाने या रोबोटिक वॉटर क्राफ्टचा वापर केला जाणार आहे.
हे आधुनिक यंत्र समुद्रात तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत वेगाने जाऊ शकते. उसळणाऱ्या महाकाय लाटांचा यशस्वी सामना करत खोल पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचून तिला सुरक्षितरीत्या किनाऱ्यावर आणण्याची क्षमता यात आहे. विशेषतः पावसाळी हंगामात खवळलेल्या समुद्रात बचावकार्य करताना याचा मोठा फायदा होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी हाताळणीसाठी जयगड पोलीस व होमगार्ड जवानांना विशेष तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उचललेले हे पाऊल पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशिक्षित पोलीस आणि होमगार्ड जवान या यंत्रणेच्या सहाय्याने समुद्रकिनाऱ्यावर सदैव दक्ष राहतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे. अत्याधुनिक वॉटर क्राफ्ट दाखल झाल्याने गणपतीपुळे किनाऱ्यावरील बुडण्याच्या दुर्घटनांना मोठा आळा बसेल, अशी भावना स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ व पर्यटकांतून व्यक्त होत आहे.





