मुंबई: महाराष्ट्रातील ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोलीसह विविध जिल्ह्यांमधील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत संबंधित न्यायालयीन परिसर रिकामा केला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ९:४३ वाजता हा धमकीचा संदेश आला होता, ज्यामध्ये दुपारी ३:११ वाजता स्फोट घडवण्याची आणि २७ नोव्हेंबरपर्यंत आयईडी स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला होता. या ई-मेलमध्ये मेट्रो स्थानके, १९८४ मधील बदला घेण्याची भाषा आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून स्फोट घडवण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.
धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी मानक कार्यपद्धतीनुसार ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या सर्व ठिकाणच्या न्यायालयांच्या इमारती तात्काळ रिकाम्या केल्या. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून इमारतींच्या आसपासचा परिसर मोकळा करण्यात आला आहे.s
घटनास्थळी बॉम्बशोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या साहाय्याने न्यायालयाच्या इमारती, पार्किंग, कँटीन आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान, हे धमकीचे ई-मेल नेमके कोणी पाठवले आणि त्यामागील उद्देश काय याचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखा कसून तपास करत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि न्यायालयीन परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्यात येईल.





