विल्ये / अमित कांबळे: रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील बुद्ध विहारामध्ये समता फाउंडेशन, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी आणि मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कळझोंडी उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी, इतर आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिराचा परिसरातील ६२ महिला व पुरुष रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिराच्या सुरुवातीला आरोग्य सेविका दिपाली गावडे यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा सविस्तर उद्देश स्पष्ट केला. या शिबिरात नागरिकांची डोळे तपासणी, रक्तदाब (बीपी), हिमोग्लोबिन (एचबी), एक्स-रे तसेच इतर किरकोळ आजारांची मोफत तपासणी करून योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान ज्या रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले आहे, त्या सर्व रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे विनामूल्य शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यांना राहणे, भोजन व काळा चष्मा या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहेत; तसेच शस्त्रक्रियेची निश्चित तारीख रुग्णांना योग्य वेळी कळविली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
याप्रसंगी विचारमंचावर कळझोंडी गावच्या माजी सरपंच तथा रत्नागिरी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मेघना पाष्टे, माजी उपसरपंच प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, जिल्हा रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय उगवेकर, समता फाउंडेशनचे नितेश शेट्ये यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय उगवेकर, नितेश शेट्ये, श्रीकृष्ण बांदेवाड, श्री. पाटील, डॉ. परशुराम निवेंडकर, श्री. रणसे, सी.एच.ओ. अक्षता शिर्सेकर, आरोग्य सेविका दिपाली गावडे, अर्चना अपकरे, आरोग्य सेवक सुरेश अंबुरे, प्रविण मंडळे तसेच आशा स्वयंसेविका साक्षी पवार, साक्षी चौघुले, वैष्णवी घाणेकर व मदतनीस नम्रता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कळझोंडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी अक्षता शिर्सेकर यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या आरोग्यदायी उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.







