रत्नागिरी: देशात गाजत असलेल्या कथित ‘व्होट चोरी’ प्रकरणावरून आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत काँग्रेसच्या वतीने येत्या सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता रत्नागिरी शहरात एका भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ज्ञानेश कुमार हटाव, लोकशाही वाचवा’ असा थेट नारा देत काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात एल्गार पुकारला आहे.
सध्या देशात निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आली असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अन्य दोन्ही निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता मनमानी कारभार हाकत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. निवडणूक आयोगाची सध्याची पक्षपाती कार्यपद्धती म्हणजे थेट लोकशाहीची आणि संविधानाची हत्या असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा हा संघर्ष अविरत सुरू राहील, असा स्पष्ट इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
हा मूक मोर्चा सोमवारी सकाळी १०:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर आणि प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिपे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमी नागरिक, कार्यकर्ते आणि जनतेला या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.





