रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ व्ही. आंबेरकर याला जामीन मिळवण्यात पुन्हा अपयश आले आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निर्णय दिला. जामिनासाठी आंबेरकर याने तब्बल ४९ परिच्छेदांचा सविस्तर अर्ज दाखल केला होता. मात्र, बचाव पक्षाचे विविध युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत.
अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, कोडवली येथील हॉटेल सरस्वतीजवळ पंढरीनाथ आंबेरकर याने आपली महिंद्रा थार गाडी विरुद्ध दिशेने चालवत शशिकांत वारीशे यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वारीशे यांचा कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. वारीशे यांनी आंबेरकर यांच्या विरोधात तसेच रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित आरोपांवर आधारित लेख प्रसिद्ध केला होता. या लेखातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून अपघाताचा बनाव करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
जामीन अर्जामध्ये आंबेरकर याने आपल्या विविध आजारांचा उल्लेख केला होता. मधुमेह, उच्च रक्तदाब, अँजिओप्लास्टी, पित्ताशयाचे विकार, मूळव्याध आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांमुळे योग्य उपचारांची आवश्यकता असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. जिल्हा रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार मिळावेत, तसेच मानसिक तणावामुळे मानसोपचार घेण्याची गरज असल्याचेही बचाव पक्षाने मांडले. याशिवाय, खटल्यातील २८ साक्षीदारांपैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह काही साक्षीदार प्रतिकूल झाले असल्याने आपल्याविरुद्धचा पुरावा कमकुवत झाल्याचा युक्तिवादही करण्यात आला.
मात्र, सरकारी पक्षाने जामीन अर्जांना विरोध करताना खटल्याचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप नोंदवायची असल्याने आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची किंवा त्यांना धमकावले जाण्याची शक्यता असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. विशेष म्हणजे, आंबेरकर याच्यापासून जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करणारे तब्बल ४७ अर्ज स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सादर केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडली. रिफायनरी परिसरातील जमिनींचे व्यवहार आणि आरोपीची राजकीय क्षेत्रातील ओळख लक्षात घेता, जामीन दिल्यास साक्षीदारांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात साक्षीदार प्रतिकूल झाले म्हणून संपूर्ण खटला संपुष्टात येत नाही, असे स्पष्ट केले. इतर महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असून जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान पुराव्यांचे अंतिम मूल्यमापन करणे योग्य ठरणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, आरोपीच्या आजारपणाच्या मुद्द्यावर यापूर्वीही उपचारांची संधी देण्यात आली असून भविष्यातही पोलीस बंदोबस्तात रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची व्यवस्था होऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रकरणाचे गांभीर्य, साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि खटल्याची सद्यस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने आंबेरकर याचे निशाणी क्रमांक ३१९ आणि ३२८ वरील दोन्ही जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकर याचा तुरुंगातील मुक्काम कायम राहणार आहे.






