रत्नागिरी : पावसाने दिलेल्या ओढीमुळे रत्नागिरी जिल्ह्यावर आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे गडद संकट ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीचा विचार करता जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी १.२३ मीटरने खाली गेली असून, एकट्या रत्नागिरी तालुक्यात ही घट सर्वाधिक म्हणजे तब्बल २.९६ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल १८३ गावांवर तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण होणार असल्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. भूजल पातळी घसरण्याच्या बाबतीत रत्नागिरी पाठोपाठ राजापूरमध्ये १.४७ मीटर, गुहागरमध्ये १.४१ मीटर, लांजामध्ये १.१७ मीटर आणि चिपळूणमध्ये १.०१ मीटरने पाणी खोल गेले आहे. परिणामी, संभाव्य पाणीबाधित क्षेत्रांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३७, संगमेश्वरमधील ३१ आणि राजापूरमधील २५ गावांचा सर्वाधिक समावेश आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १९.८१ टक्के कमी पाऊस झाला असून, ३ हजार ३९५ मिलिमीटरच्या सरासरी पर्जन्यमानासमोर केवळ २ हजार ६९९.५३ मिलिमीटर इतकीच पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या तुटीची ही टक्केवारी संगमेश्वरमध्ये ३५.४१ टक्के, राजापूरमध्ये ३४.५५ टक्के, रत्नागिरीत २७.२३ टक्के, दापोलीत २४.२१ टक्के आणि मंडणगडमध्ये २१.६२ टक्के इतकी चिंताजनक राहिली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यातील ५८ निरीक्षण विहिरींनी तळ गाठल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरीची वैशिष्ट्यपूर्ण डोंगराळ रचना आणि सच्छिद्र खडकांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता मोठ्या प्रमाणावर वाहून जाते, ज्यामुळे भूजल पुनर्भरण अत्यंत मर्यादित राहून पाऊस थांबताच विहिरी व कूपनलिका वेगाने कोरड्या पडू लागतात. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात गावागावांत पर्यायी पाणीपुरवठा, टँकर्सचे नियोजन आणि आपत्कालीन उपाययोजना राबवून या आव्हानाचा सामना करणे ही प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.




