गणपतीपुळे (वैभव पवार): डेरवण येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी प्रशालेच्या खेळाडूंनी अचूक वेध घेत सुवर्ण कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत प्रशालेच्या देवर्षी कासार आणि कृष्णा कासार या सख्ख्या भावंडांनी अनुक्रमे १७ वर्षे व १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला. या दोघांचीही आता विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा संकुल डेरवण येथे शालेय क्रीडा विभागामार्फत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन घडवले. १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात कु. देवर्षी शैलेश कासार हिने कौशल्याच्या बळावर अव्वल स्थान राखत प्रथम क्रमांक पटकावला, तर १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात कु. कृष्णा शैलेश कासार याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या दोन्ही खेळाडूंच्या घवघवीत यशामुळे त्यांचा पुढील विभागीय स्पर्धेत खेळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनिया सेठी यांनी खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक रणजित जाधव, मिथिला मोरे, आदित्य पवार, रोहित तसेच त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षक पुष्कराज इंगवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिंदल विद्या मंदिरचे सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि पंचक्रोशीतून या गुणवंत खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.






