कळंब/धाराशिव: चारित्र्यावर घेतलेल्या अवाजवी संशयाने संतापाची सीमा ओलांडल्याने एका बेरोजगार अभियंत्याने आपल्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याच्या देखत पत्नीला निर्घृणपणे संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव शिवारात ज्वारीच्या शेतात नेऊन पत्नी कोमल गणेश टेकाळे हिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली असून, या अमानुष कृत्यानंतर संशयित पती गणेश शिवाजी टेकाळे (रा. पुनर्वसन सावरगाव) हा फरार झाला आहे. हत्येपूर्वी कथित कबुलीचा व्हिडिओ तयार करून तो नातेवाईकांना पाठवणे आणि हत्येनंतर व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून ‘पत्नीला शिक्षा दिली’ असा दावा केल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित अभियंता असलेला गणेश टेकाळे हा सध्या बेरोजगार होता आणि मागील काही दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान गणेश आणि कोमल यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. प्राथमिक तपासातील माहितीनुसार, पतीने दबाव आणून पत्नीचा कथित अनैतिक संबंधांबाबत कबुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो नातेवाईकांसह इतरांना पाठवून दिला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास गणेशने कोमल आणि आपल्या चार वर्षांच्या मुलाला दुचाकीवर बसवून हासेगाव (केज) शिवारातील निर्मनुष्य ज्वारीच्या शेतात नेले. तिथे पोहोचताच त्याने कोमलला बेदम मारहाण करत थेट दगडाने ठेचून तिचा जीव घेतला. हे संपूर्ण भयानक हत्याकांड अवघ्या चार वर्षांच्या मुलासमोर घडले असून, नंतर याच मुलाने पोलिसांना घटनास्थळ दाखवल्याचे समोर आले आहे.
हत्येनंतर लगेचच आरोपीने स्वतःच्या व्हॉट्सॲपवर गुन्हा कबूल करणारे स्टेटस ठेवले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने महत्त्वाचे पुरावे गोळा करत पंचनामा पूर्ण केला. आरोपीने शूट केलेला व्हिडिओ आणि त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस पोलिसांच्या तपासात निर्णायक पुरावे ठरण्याची शक्यता आहे. हे हत्याकांड पूर्वनियोजित होते का, व्हिडिओमागील नेमके वास्तव काय आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, अशा सर्व पैलूंनी पोलीस तपास करत असून, फरार संशयित पती गणेश टेकाळे याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.





