देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील ढिसाळ नियोजनामुळे पसरलेल्या असह्य दुर्गंधीविरोधात कांजिवरा परिसरातील संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकल्पात साचलेल्या कुजक्या कचऱ्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि माश्यांच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दुर्गंधीयुक्त कचरा वाहून नेणारी घंटागाडी अडवून ती थेट देवरूख नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात नेऊन प्रशासनाला जाब विचारला. या प्रकारामुळे नगरपंचायतीचा कचराप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रकल्पाच्या ठिकाणी साठवल्या जाणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने संपूर्ण कांजिवरा परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जगणे मुश्कील झाले असून, नजीकच्या विहिरींमधील पिण्याचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तक्रारी करूनही यंत्रणा ढिम्म राहिल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी घंटागाडीसह नगरपंचायत गाठून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून दिली.
या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी कचऱ्याच्या समस्येबरोबरच कांजिवरा परिसरातील प्रलंबित असलेल्या १२ फुटी रस्त्याच्या कामाचा मुद्दाही उपस्थित केला. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा आणि मूलभूत पायाभूत सुविधांशी संबंधित या गंभीर प्रश्नांवर केवळ कागदी आश्वासने न देता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून दुर्गंधीवर मात करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली असून नगरपंचायत प्रशासन यावर काय ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण देवरूख शहराचे लक्ष लागले आहे.





