सुरत: राज्यभरात गणेश विसर्जन सोहळ्याचा उत्साह सुरू असतानाच, गुजरातच्या सुरत जिल्ह्यात मुंबईतील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. मुंबईहून गुजरातमधील शंखेश्वर रायजी मंदिराकडे दर्शनासाठी निघालेल्या भरधाव कारने द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या डंपरला मागून भीषण धडक दिली. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कामरेज तालुक्यात भारतमाला एक्सप्रेसवेवर घडलेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कामरेज परिसरातील द्रुतगती मार्गावरून जात असताना चालकाला वेळेवर ब्रेक लावणे शक्य न झाल्याने कार महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरच्या मागच्या भागावर थेट आदळली, अशी माहिती सुरत जिल्हा वाहतूक निरीक्षक (पीएसआय) ईश्वर सिंग सिसोदिया यांनी दिली. अपघाताची भीषणता पाहून स्थानिक यंत्रणांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले. घटनेची माहिती मिळताच सुरत जिल्हा वाहतूक पोलीस, कामरेज पोलीस आणि द्रुतगती मार्ग गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने चक्काचूर झालेली कार बाजूला करून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी कामरेज सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) पाठवण्यात आले.
तपासादरम्यान अपघातग्रस्त चारचाकीतील सर्व प्रवासी मुंबई येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतांमध्ये कारचालक राजीव जितेंद्र जैन यांच्यासह जयंतिलाल चुनीलाल दोशी आणि प्रवीण जैन यांचा समावेश असून, चौथ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या हृदयद्रावक अपघाताप्रकरणी कामरेज पोलिसांनी अधिकृत गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे.





