नवी दिल्ली : ‘माझ्या नागरिकत्वाबाबत पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे खोटी असून माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यामुळे इतर नागरिकांप्रमाणेच मलाही संविधानाने समान अधिकार दिले आहेत,’ असे स्पष्ट करत प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीने दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर सडकून टीका केली आहे. घरातून बेकायदेशीररीत्या फरफटत नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत ही कारवाई म्हणजे कायदेशीर अटक नसून थेट अपहरण असल्याचा घणाघाती दावा त्याने सुटकेनंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. या संपूर्ण प्रकारावरून देशात सध्या अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करत त्याने केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील अनियमिततांविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी सकाळी ध्रुव राठीला घरातून ताब्यात घेतले होते. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्याची सुटका झाली. त्यानंतर आपली भूमिका मांडताना राठीने सांगितले की, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घरात झोपेत असताना गणवेशातील पोलीस आणि साध्या कपड्यातील सुमारे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांच्या फौजेने घरात जबरदस्तीने प्रवेश केला. आईला बाजूला ढकलून बेडरूममध्ये घुसलेल्या या पथकाने कोणतीही ओळख न सांगता किंवा कायदेशीर कारण न देता थेट बेडरूममधून फरफटत बाहेर काढले आणि पायात चप्पलही घालू दिली नाही. या झटापटीत मारहाण झाल्यामुळे शरीरावर जखमा झाल्या असून आई-वडिलांनाही शारीरिक त्रास देण्यात आल्याचे त्याने नमूद केले.
या कारवाईनंतर तब्बल बावीस ते तेवीस तास स्वतःचा आणि पालकांचा फोन जप्त करून ठेवल्यामुळे वकिलांशी संपर्क साधू दिला नाही किंवा घडल्या प्रकाराचे रेकॉर्डिंगही करता आले नाही, असा आरोपही त्याने केला आहे. कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याचे हमीपत्र दिल्याचा दावा फेटाळत त्याने कायदेशीर मार्गाने नोटीस दिली असती तर आपण स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालो असतो, असे स्पष्ट केले. दरम्यान, सुटकेनंतर सीजेपीचे राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका यांनीही केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, जंतर-मंतरवरील आपला लढा अधिक तीव्रतेने सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे.





