रत्नागिरी : स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, चालता येत नाही; मात्र आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. शरीराला आलेल्या मर्यादांवर मात करत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तीव्र दिव्यांगांनी मुंबई ते गोवा असा विमान प्रवास करत गगनभरारी घेतली. ‘पायांना मर्यादा असल्या तरी स्वप्नांना नाहीत’ हा प्रेरणादायी संदेश देणारी ही विमान प्रवास सहल उत्साहात आणि अविस्मरणीय आठवणींसह पार पडली.
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून दरवर्षी प्रत्येकी एका दिव्यांगाची या विशेष विमान प्रवास सहलीसाठी निवड केली जाते. पोलिओ, पॅराप्लेजिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी यांसारख्या तीव्र दिव्यांगत्वामुळे स्वतःच्या पायावर उभे राहणे अथवा चालणे शक्य नसलेल्या दिव्यांगांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे हा संपूर्ण विमान प्रवास विनाशुल्क आयोजित केला जात असल्याने अनेकांसाठी हा आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास ठरतो.
या वर्षी सूरज सुरेश चव्हाण (राजापूर), देवेश अजित कुळ्ये (लांजा), मंदार रमेश आग्रे (संगमेश्वर), रघुनाथ भगवान गोरे (खेड), द्रोपदी बाल्या चोळले, सूर्यकांत गोविंद चोगले (दापोली), रिया संदीप मोरे (खेड), श्रावणी चंद्रशेखर शिंदे (चिपळूण) आणि सुगंधा अनंत कोदारे (संगमेश्वर) यांनी या सहलीत सहभाग घेतला. त्यांच्या सोबत मदतनीस म्हणून समीर करीम नाकाडे (रत्नागिरी), साक्षी संदीप मोरे (खेड) तसेच सहलीचे आयोजक अशोक विठ्ठल भुस्कुटे सहभागी झाले.
सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सर्व दिव्यांग भुस्कुटे यांच्या निवासस्थानी एकत्र आले. बापू काणे यांच्या येथे भोजन केल्यानंतर मध्यरात्री टेम्पो ट्रॅव्हलरने मुंबईकडे प्रयाण करण्यात आले. मंगळवारी सकाळी भुस्कुटे यांच्या कन्या आलिया हुजेर खान व जावई हुजेर रशीद खान यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी सर्वांच्या फ्रेश होण्याची, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दिव्यांगांसाठी या कुटुंबाने दाखविलेल्या आपुलकीमुळे सहलीतील सहभागी भारावून गेले. ‘कुणाला मदत करण्यासाठी घर मोठे असण्याची आवश्यकता नसते, तर मन मोठे असावे लागते,’ याची प्रचिती या कुटुंबाच्या आदरातिथ्यातून आली.
दुपारी दोन वाजता सर्वजण सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरील वातावरण, विमान कंपनीची सेवा आणि आयुष्यातील पहिल्या विमान प्रवासाची उत्सुकता यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सायंकाळी चार वाजता सर्वजण विमानात आसनस्थ झाले आणि साडेचारच्या सुमारास विमानाने आकाशात झेप घेतली. पृथ्वीतलावर स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसतानाही आकाशात उडण्याचा अनुभव या दिव्यांगांसाठी भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.
विमानाच्या खिडकीतून दिसणारे निळेशार आकाश, ढग, खालील भूप्रदेश आणि निसर्गदृश्ये कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सहभागींची लगबग सुरू होती. आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलेल्या या प्रवासातील प्रत्येक क्षण आठवणीत साठवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहातून दिसून येत होता. सायंकाळी साडेपाच वाजता विमान दाबोळी, गोवा येथे दाखल झाले. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नऊ दिव्यांगांसाठी नऊ व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सर्वांना सुरक्षितपणे विमानतळाबाहेर आणून टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसविण्यात आले.
जुना गोवा रस्त्यावरील कालापूर येथील रुग्णाश्रय आश्रमात त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भुस्कुटे यांचे मामेभाऊ दिलीप सहकारी यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या व्यवस्थेत संस्थेचे पदाधिकारी व सहकारी दिव्यांगांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. रुग्णाश्रय संस्थेच्या अध्यक्षा चित्रा नाईक यांनी प्रत्येक दिव्यांगाची आस्थेने विचारपूस करून त्यांना भेटवस्तू दिल्या. संस्थेच्या वतीने दिव्यांगमित्र अशोक भुस्कुटे यांचा विशेष सन्मानही करण्यात आला.
गोव्यातील मुक्कामानंतर २३ सप्टेंबर रोजी सकाळी रुग्णाश्रय येथे चहा-नाश्ता करून सर्वांनी ट्रॅव्हलरने मडगाव रेल्वे स्थानक गाठले. तेथून जनशताब्दी एक्स्प्रेसने परतीचा प्रवास सुरू झाला. चार दिव्यांग व एक सहकारी रत्नागिरी येथे उतरले, तर उर्वरित पाच दिव्यांग व दोन सहकारी चिपळूण येथे उतरले. काही दिवस एकत्र घालवून निर्माण झालेल्या आठवणी आणि अनुभव मागे ठेवताना सहभागींच्या डोळ्यांत भावुकता होती.
ही सहल यशस्वी करण्यासाठी नियोजनापासून प्रत्यक्ष प्रवासापर्यंत दिव्यांगांना उचलणे, व्हीलचेअरची व्यवस्था करणे, त्यांना विमानतळ, रेल्वे स्थानक आणि वाहनांमध्ये सुरक्षितपणे ने-आण करणे तसेच प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेण्याचे आव्हानात्मक काम समीर करीम नाकाडे यांनी विशेष परिश्रम घेऊन पार पाडले. गोव्यात दाखल झाल्यापासून दिव्यांगांना जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये सुरक्षितपणे बसवून देईपर्यंत भुस्कुटे यांच्या मानसकन्या साधना गुढेकर यांनीही मोलाची भूमिका बजावली.
नऊ दिव्यांगांचा हा विमान प्रवास केवळ मुंबई ते गोवा असा प्रवास नव्हता, तर शारीरिक मर्यादांवर मात करत स्वप्नांना आकाश देणारा अनुभव होता. अनेकदा घराचा उंबरठाही ओलांडणे कठीण असलेल्या दिव्यांगांना विमानातून आकाशात भरारी घेण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळाली. शरीराला मर्यादा असू शकतात; मात्र स्वप्नांना कोणतीही सीमा नसते, हे या अविस्मरणीय सहलीने पुन्हा एकदा अधोरेखित केले.





