रत्नागिरी : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेमुळे एका तीन वर्षांच्या चिमुरडीच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली असून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा सुंदर हास्य फुलले आहे. चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील कु. हर्षाली सीताराम मोरे हिच्यामध्ये तपासणीदरम्यान ‘दुभंगलेले ओठ आणि टाळू’ (क्लेफ्ट लिप व पॅलेट) हा जन्मजात शारीरिक दोष असल्याचे समोर आले होते. यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) तत्पर समन्वयातून डेरवण येथील नामांकित बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलच्या योजनेअंतर्गत तिच्यावर कोणतीही फी न आकारता अत्यंत गुंतागुंतीची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर लहानग्या हर्षालीच्या प्रकृतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि तिच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः भेट दिली. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन मयेकर, डॉ. गायत्री फडके, श्री. तायडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. हल्ये मॅडम, आरबीएसके पथक तसेच स्थानिक अंगणवाडी सेविका व मदतनीस आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुरडीच्या प्रकृतीची सखोल तपासणी करत तिच्या पुढील योग्य संगोपनाबाबत व आवश्यक देखभालीविषयी पालकांना महत्त्वपूर्ण वैद्यकीय मार्गदर्शन केले. प्रशासनाने वेळेवर राबवलेली आरोग्य तपासणी आणि मिळालेल्या तत्पर उपचारांमुळेच आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य परतल्याची भावूक भावना व्यक्त करत, मोरे कुटुंबीयांनी आरोग्य यंत्रणा व शासनाच्या या अभियानाप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.




