रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळत असून, स्थानिक भाजप पदाधिकारी प्रकाश भिवंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यामुळे कोंडये, हसोळ आणि जुवाठी या गावांमधील विविध रस्त्यांच्या कामांसाठी ४० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे.
कोंड्ये तर्फे सौंदळ येथील गणेश मंदिर ते भातडे घर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख रुपये, हसोळ कोंडवाडी ते तळगाव सुतारवाडी शाळा क्रमांक २ या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख रुपये, हसोळ मधलीवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख रुपये, तर जुवाठी येथील भंडारवाडी चाळ्याचा मळा ते भंडारवाडी चव्हाटा या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता या कामांची मागणी स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. प्रकाश भिवंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या निधीमुळे संबंधित गावांमधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
निधी मंजूर झाल्याने संबंधित गावांतील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून, खासदार नारायण राणे, प्रकाश भिवंदे तसेच पाठपुरावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात येत आहेत.






