रत्नागिरी / वैभव पवार: रत्नागिरी आगारातून ग्रामीण व पर्यटन मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसच्या वाढत्या अनियमितेमुळे प्रवासी, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून, या गलथान कारभाराविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी थेट विभाग नियंत्रकांकडे दाद मागितली आहे. वारंवार विनासूचना अचानक फेऱ्या रद्द करणे, ऐन गर्दीच्या वेळी गाड्या उपलब्ध न ठेवणे आणि प्रवाशांना वेठीस धरण्याच्या महामंडळाच्या धोरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, सकाळी ७.१५ वाजता सुटणारी आरेवारे मार्गे मालगुंड बस अत्यंत अनियमित असून अनेकदा शेवटच्या क्षणी ती रद्द केली जाते. ही गाडी मालगुंडहून सकाळी ८.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघते. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. मालगुंड, गणपतीपुळे, भंडारपुळे, नेवरे व आरेवारे भागातून भरून वाहणाऱ्या या गाडीतून मिळणारे उत्पन्न नेमके किती, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी; कारण कोणतीही पूर्वकल्पना न देता ऐनवेळी ही फेरी रद्द झाल्यास पुढील गाडी मिळेपर्यंत प्रवाशांना तासन्तास रखडावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
गणपतीपुळे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन क्षेत्र असताना महामंडळाच्या अनास्थेमुळे खाजगी ट्रॅव्हल्सचे उखळ पांढरे होत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. येथून मुंबईसाठी नियमित एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी बसेसकडे वळावे लागत आहे. मुंबईच्या मार्गावर रोज खाजगी कंपन्यांच्या ७ बसेस भरून धावत असताना एसटी महामंडळ मात्र नफ्याच्या या मार्गावर डोळेझाक करत आहे. पूर्वी रत्नागिरीहून मुंबईसाठी धावणाऱ्या बसेस अचानक बंद करून महामंडळाने सर्वसामान्य प्रवाशांना वाऱ्यावर सोडले असून, यामागे खाजगी बसचालकांचे खिसे भरण्याचे आणि कोणाचे हितसंबंध जोपासण्याचे षडयंत्र आहे का, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. कोणतीही पूर्वसूचना, जाहिरात अथवा माहिती न देता केवळ आर्थिक नुकसानीचे कारण पुढे करत फायद्याच्या गाड्या बंद करून प्रवाशांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामीण भागातील दळणवळण सुरळीत होण्यासाठी प्रवाशांनी काही ठोस उपाययोजना मांडल्या आहेत. त्यानुसार गणपतीपुळे येथून रात्री ८ वाजता सुटणारी मुंबई सेंट्रल गाडी सुरू करावी; तसेच रात्री ९.३० नंतर मुंबई अथवा रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी गणपतीपुळे येथून एकही गाडी उपलब्ध नसल्याने रात्रीच्या ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांना ४ ते ५ तास आधीच जाऊन ताटकळत बसावे लागते. यासाठी मालगुंड येथून रात्री ८ वाजता आरेवारे मार्गे गणपतीपुळे, भंडारपुळे, नेवरे, बसणी मार्गे रत्नागिरीसाठी गाडी सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच मुंबई सेंट्रलहून सायंकाळी ७ वाजता सुटणारी गाडी परतीच्या प्रवासात गणपतीपुळेसाठी शेवटची गाडी म्हणून चालविल्यास त्याचा प्रवाशांना थेट फायदा होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय रत्नागिरी आगारातून दुपारी १.३० वाजता सुटणारी आरेवारे मार्गे गणपतीपुळे गाडी सध्या केवळ गणपतीपुळेपर्यंतच चालविली जाते. ही बस मालगुंड आणि वरवडेपर्यंत वाढविल्यास त्या भागातील प्रवाशांना रिक्षांच्या अवाजवी भाडेदरापासून मुक्ती मिळेल. प्रत्यक्ष पाहणी केल्यास उन्हाळ्यात दुपारच्या वेळी गणपतीपुळे येथे उतरून पुढे जाणारे प्रवासी भरपूर असतात, त्यामुळे ही गाडी मालगुंडपर्यंत नेणे अत्यावश्यक ठरले आहे. तसेच मालगुंडहून निवेदी मार्गे वरवडे-रत्नागिरी जाणारी सकाळी सुटणारी बस कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने सकाळच्या नोकरदार व प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. दापोली, गुहागर, चिपळूण आदी लांब पल्ल्याच्या बाहेरून येणाऱ्या फेऱ्या अचानक परस्पर रद्द न करता संबंधित आगारांशी योग्य समन्वय साधून नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमच्या या सर्व रास्त मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक आणि तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा प्रशासनाच्या या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये पसरलेला रोष रस्त्यावर उतरून लोकक्षोभाचे कारण ठरेल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थ, प्रवासी व विद्यार्थ्यांनी दिला आहे.





