तरवळ (अमित जाधव): रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथील जिल्हा परिषद शाळा मायंगडेवाडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज वर्गखोलीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या लक्षात घेता बसण्यासाठी वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने ग्रामस्थ व पालकांनी याविषयी मंत्री महोदयांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या मागणीची तत्परतेने दखल घेत ना. डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा वार्षिक नियोजन योजनेच्या २०२६-२७ च्या विकास निधीतून या नव्या वर्गखोलीच्या बांधकामाला मंजुरी मिळवून दिली आणि प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ केला. करबुडे जिल्हा परिषद गटातील गावांना भेटी देत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्याच्या विशेष संवाद दौऱ्यादरम्यान त्यांनी तरवळ आणि आगवे गावाला सदिच्छा भेट दिली असता, दोन्ही गावांतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ना. डॉ. सामंत यांनी गावकऱ्यांच्या अतूट एकजुटीचे विशेष कौतुक केले. राजकारणाच्या प्रारंभापासून गेली पंचवीस वर्षे या गावाने माझ्यावर जिवापाड प्रेम केले असून आज पंचवीस वर्षांनंतरही हे गाव तितक्याच ताकदीने माझ्या पाठीशी खंबीर उभे असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी भक्कम ग्वाही त्यांनी दिली. तरवळ गावात कधीही जातीपातीचे भेद पाळले जात नसून येथे केवळ आणि केवळ विकासाचे राजकारण चालते, हे या गावाने संपूर्ण जिल्ह्याला कृतीतून दाखवून दिल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
जाकादेवी पंचक्रोशीमध्ये कै. शामराव पेजे यांना अभिप्रेत असलेले भव्य कुणबी भवन हे स्मारक म्हणून कुणबी समाजाच्या एकाही व्यक्तीच्या खिशातून एकही रुपया न घेता केवळ दोन वर्षांत पूर्णत्वास नेल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कुणबी समाजाच्या नावापुढील ‘तिलोरी’ हा शब्द वगळून समाजबांधवांवर मोठा अन्याय केला होता; मात्र महायुतीचे शासन येताच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदेश काढून ‘तिलोरी’ शब्दाची पुनर्स्थापना करण्यात आली आणि समाजाला १३ व्या क्रमांकाच्या सूचित समाविष्ट करून लाखो बांधवांना न्याय मिळवून दिला, याचे स्मरण त्यांनी करून दिले. राज्यात नव्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवत तरुणांच्या हातांना मोठ्या प्रमाणावर हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार असून, जनसामान्यांच्या हिताची ‘लाडकी बहीण योजना’ जोपर्यंत महायुतीचे शासन आहे तोपर्यंत अविरत सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दिमाखदार सोहळ्यास शिवसेना तालुकाप्रमुख व जि. प. सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप, रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, तरवळ-आगवे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश मालप, उपसरपंच सुयोग माचीवले, युवासेना विभागप्रमुख नंदकुमार कुवार, महादेव मायंगडे, जनार्दन कुळ्ये, गुणाजी मालप, महादेव कुळ्ये, रवींद्र कुळ्ये यांच्यासह तरवळ व आगवे परिसरातील ग्रामस्थ, महिला, शिक्षक वर्ग आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





