लांजा (अरबाज नेवरेकर) : मानवी वस्तीत घुसणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्त करणाऱ्या लांजा तालुक्यातील सर्पमित्रांच्या विविध समस्यांवर मंगळवारी प्रशासकीय पातळीवर सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील निसर्ग संवर्धन संस्थेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार प्रियांका ढोले यांची भेट घेऊन सर्पबचाव मोहिमेदरम्यान भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या तसेच आवश्यक साधनसामग्री व प्रशासकीय सहकार्य मिळवून देण्याची मागणी केली.
तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मानवी वस्तीत साप आढळल्यास नागरिक भीतीपोटी तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधतात. निसर्ग संवर्धन संस्थेचे सुमारे वीस सर्पमित्र कोणतीही वेळ न पाहता नागरिकांच्या हाकेला प्रतिसाद देत घटनास्थळी पोहोचतात. सापांची सुरक्षित सुटका करून त्यांना जंगलात सोडून ते जैवविविधतेचे रक्षण करतात आणि नागरिकांमधील भीती दूर करून संभाव्य जीवितहानी टाळतात. मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कार्य करत असताना सर्पमित्रांना आधुनिक बचाव साधने, सुरक्षित किट आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधांचा अभाव सातत्याने जाणवत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.
सर्पबचावाच्या या जोखमीच्या कामासाठी महसूल प्रशासन आणि वनविभागाकडून अधिक सक्रिय पाठबळ मिळावे, तसेच सर्पमित्रांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार प्रियांका ढोले यांनी सर्पमित्रांचे म्हणणे अत्यंत सकारात्मकतेने ऐकून घेत, त्यांच्या या महत्त्वपूर्ण जनहितैषी कार्याचे कौतुक केले. या संदर्भात नियमानुसार आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासकीय पातळीवर उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीदरम्यान निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिन जाधव, संदेश जाधव, चेतना कांबळे, मंगेश पांचाळ, विशाल कांबळे, अजय मेहेर, प्रविण कांबळे, भारत पालवकर, मिथुन कांबळे यांच्यासह इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.






