आमदार किरण सामंत व युवानेत्या अपूर्वा सामंत यांची प्रमुख उपस्थिती
लांजा(अरबाज नेवरेकर) : संपूर्ण कोकणात आपल्या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे प्रसिद्ध असलेल्या भव्य फॅन्सी दांडिया स्पर्धेचे आयोजन यंदाही फ्रेंड्स सर्कल, लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या निमित्ताने लांजा शहरातील कोर्ले रोडवरील रॉयल पार्क येथे ही स्पर्धा रंगणार असून, दांडियाप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
लांजा शहरातील कोर्ले रोडवरील इलाईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे समीरशेठ घारे यांच्या कार्यालयासमोरील रॉयल पार्क येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या या फॅन्सी दांडिया स्पर्धेने संपूर्ण कोकणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यंदाच्या स्पर्धेत बालगट व खुला गट अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. बालगटाची स्पर्धा रात्री ७.३० वाजता, तर खुल्या गटाची स्पर्धा रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. आकर्षक वेशभूषा, विविध कलात्मक सादरीकरणे आणि दांडिया नृत्याचा रंगतदार आविष्कार हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत तसेच युवानेत्या अपूर्वा सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा केवळ लांजा शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण कोकणात प्रसिद्ध झाली आहे. दांडिया नृत्याच्या माध्यमातून बालकलाकारांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या भव्य फॅन्सी दांडिया स्पर्धेत दांडियाप्रेमी, स्पर्धक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन फ्रेंड्स सर्कल, लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.





