मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील राममंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात पसरलेल्या तीव्र रासायनिक वायूमुळे गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
राममंदिर पूर्व येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळ पारशी पंचायत गेटसमोरील सार्वजनिक शौचालयात ही दुर्घटना घडली. प्रभाकर धनिवर (२४) आणि भाविन देसाई (१८) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही रात्री प्रातर्विधीसाठी सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्याचवेळी शौचालयात अचानक तीव्र रासायनिक वास पसरला. या वायूमुळे दोघांना श्वास घेण्यास त्रास होऊन ते गुदमरले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोघांना मध्यरात्रीच्या सुमारास जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी पहाटे ३ वाजून ४९ मिनिटांनी दोघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, सार्वजनिक शौचालयात विषारी रासायनिक वायू नेमका कशामुळे तयार झाला आणि तो तेथे कसा पसरला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, वायूच्या निर्मितीमागील कारण शोधले जात आहे. तपासातून या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू
Leave a Comment






